हे परमेश्वरा मी तुझी कशाने पूजा करावी असा संदेह माझ्या मनात निर्माण झाला आहे, तो संदेह तु दूर कर. तुला उदकाने/पाण्याने न्हाऊ घालू म्हटलं तर ते उदकही तुच निर्माण केलेलं आहे. त्यात माझं स्वतःचं असं काय आहे ? तुझं नाम हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे, माझा धूप, दीप सारं काही तुझं नाम आहे असं तुकाराम महाराज सांगतात. पुजा-यांनी देवपुजेची अनेक थोतांडं निर्माण केली आहेत. पंढरपूरपासून बालाजीपर्यंत कुठेही गेलो तरी देव पूजायचा म्हणजे त्याला पाण्याने, दह्यादुधाने आंघोळ घालायची, तेला-तूपाचा अभिषेक करायचा, हळदीकुंकू वाहायचे. पानंफुलं वहायची. त्याच्यापुढे धूप जाळायचा. अगरबत्या लावायच्या. दीप लावायचे. दीप ओवाळायचे. घंट्या बडवायच्या. देवापुढे नैवैद्य ठेवायचा. देवाला बळी म्हणून कोंबडं, बकरं कापायचं. यज्ञयाग करायचे. त्यात प्राण्यांचे बळी द्यायचे. तूप जाळायचं. लाकडं जाळायची. होमहवन करायचे. तुकाराम महाराज सांगतात की मी यापैकी कशाने तुझी पूजा करावी असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला आहे. तु त्याचं निरसन कर. कारण *सर्व ब्रह्मांडच जर देवाने निर्माण केलं आहे. चंद्र, सूर्य, तारे, आकाशगंगा, हवा-पाणी-माती आदी पंच महाभूतं, प्राणी, पक्षी, जलचर, भूचर, वृक्ष-वेली, फळं-फुलंहे सारं दृश्य-अदृश्य चराचर जर देवानेच निर्माण केलं असेल, तर मग त्याने निर्माण केलेलं फूल त्यालाच वहायचं, त्यानेच निर्माण केलेल्या बोकडाचा त्याला बळी द्यायचा, त्यानेच निर्माण केलेलं नारळ त्यालाच फोडायचं, त्यानेच निर्माण केलेलं दूध-दही-तूप त्यालाच अर्पण करण्यात काय अर्थ आहे ?* आपलं स्वतःचं काही असेल तर ते देण्यात अर्थ आहे. समजा, दुस-या कोणी आपल्या खिशात हात घालून, आपले पैसे काढले आणि आपल्यालाच दिले तर ते त्याचं देणं असेल का ? अत्यंत तर्कशुद्ध असा विचार मांडून तुकाराम महाराज उपदेश करतात की *देवाची पूजा करायला आपल्या मुखातून बाहेर पडणारं त्याचं नाम, त्याचं स्मरण पुरेसं आहे. त्याला इतर कुठलेही कर्मकांड करण्याची गरज नाही. त्याला कोणतीही वस्तू वा पदार्थ अर्पण करण्याची वा बळी देण्याची गरज नाही.* आपल्याकडे देवाच्या नावावर सर्वत्र पूजाअर्चा, अभिषेक, अनुष्ठान, यज्ञयाग चालू असतात. एकीकडे माणसं उपाशी मरतात तर दुसरीकडे देवाला दुधाचा, दह्याचा, तुपाचा, तेलाचा अभिषेक केला जातो. एकीकडे कुपोषणाने लहान बालकं अकाली मरणाला मिठी मारतात, दुसरीकडे नारळाचं पौष्टिक पाणी देवाच्या नावावर फेकलं जातं. अक्षतांच्या नावाखाली तांदूळ पायदळी तुडवला जातो. जिवंत माणसाला रहायला घर मिळत नाही आणि करोडो रूपये मोठमोठी देवळं बांधण्यात खर्च केले जातात. गरीब स्रीयांकडे अब्रू झाकाण्यापुरतं वस्त्र नसतं आणि दगडाच्या देवाला भरजरी वस्त्रं, सोन्याचांदीच्या दागिण्यांनी मढवलं जातं. गरीब मुलं जनावराप्रमाणे उकीरड्यावरचं शिळंपाकं, खरकटं, उष्टं अन्न वेचून खातात तर दगडाच्या देवाला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. *जर सर्व एकाच देवाची लेकरं असतील तर मग ही विषमता कशी ?* आणि देव तरी हा पराकोटीचा भेदभाव कसा सहन करील ? जो करील तो देव कसला ? दगडाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यापेक्षा ते पाणी तहानलेल्या गाढवाला पाजणं जास्त महत्त्वाचं हे संत एकनाथांनी आपल्या प्रत्यक्ष क्रूतीतून शिकवलं. तरीही लोक अंधपणे दगडाच्या मूर्तीलाच देव समजतात. *"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी "* इतक्या रोखठोक भाषेत जगदगुरू तुकाराम महाराज चारशे वर्षांपूर्वी सांगतात तरी आजही देवाधर्माच्या नावावर फसवणूक, लूट, शोषण सुरूच आहे. *जत्रा में बिठाया फतरा।* *तीरथ बनाया पानी ।।* *दुनिया भयी दिवानी ।* *पैसे की धुलधानी ।।* असं कबीर तेराव्या शतकात सांगून गेले, संतशिरोमणी नामदेव महाराजांपासून सा-या वारकरी संतांनीही हाच उपदेश केला आहे. तरीही समाज आजही वेडाचार सोडायला तयार नाही. आज *करोनाने दाखवून दिलं की या संकटातून वाचवण्यासाठी कोणीही देव येत नाही. माणसंच माणसाच्या उपयोगी पडतात.* खरोखरच कोणाचा जर ही सारी अदभूत स्रूष्टी निर्माण कळणा-या अलौकिक शक्तीवर विश्वास असेल, तिलाच तो देव मानत असेल तर त्याला कोणाचीही हरकत असायचं कारण नाही, पण तिला प्रसन्न करण्यासाठी कोणतंही कर्मकांड करायची, पूजाअर्चा, धूपदीप, अभिषेक-अनुष्ठान , यज्ञयाग करायची गरज नाही हे तुकाराम महाराज आपल्याला या अभंगातून समजावून सांगत आहेत. - उल्हास पाटील *गाथा परिवार* ९९७५६४१६७७
गाथा परिवार
सत्य असत्याशी मन केले! ग्वाही मानियेले नाही बहुमता !!
