माझ्यासाठी सर्वजण देव झाले, हे जाणल्याने माझे सर्व दोष दूर झाले. हे फारच चांगलं झालं. त्याने चित्ताला /मनाला महान लाभ झाला. आरशासमोर उभं राहिलो तर समोर आरशात दुसरं कोणी आहे असं वाटतं. पण पहाणारा आणि त्याचं प्रतिबिंब हे दोन्ही एकच असतात. तुकाराम महाराज सांगतात ओहोळाचं पाणी एकदाचं समुद्राला जाऊन मिळालं म्हणजे ते समुद्रच होऊन जाते तसं हे आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराज *अद्वैताचं तत्वज्ञानच मांडत आहेत.* जे पिंडी तेच ब्रह्मांडी असेल, जर प्रत्येकात तेच ब्रह्म असेल तर मग प्रत्येक व्यक्ती देव होऊन जाते. जर सगळेच देव असतील तर मग माणसामाणसात भेद कसा ? याचं ज्ञान झालं म्हणजे मनातले भेद, उच्चनीचतेची भावना, द्वेष, अहंकार आदी विकार गळून पडतात. चित्त निष्कपट होतं. मग *‘आनंदाचे डोही, आनंद तरंग ’* अशी आनंदविभोर मन:स्थिती होते. आरशासमोर उभ्या व्यक्तीचं प्रतिबिंब आरशात दिसतं. व्यक्ती आणि प्रतिबिंब दोन वेगळे दिसत असले तरी ते एकच असतात. व्यक्तीशिवाय तिचं प्रतिबिंब अस्तित्वात असू शकत नाही. ओहोळ स्वतंत्र असला तरी तो एकदा समुद्राला मिळाला की समुद्राशी एकरूप होऊन जातो. त्याचं वेगळेपण रहात नाही. तसंच सर्वांभूती ब्रह्म ही जाणिव झाली की कृत्रिम भेद गळून पडतात. प्रत्येकाने हा विचार अंगी बाणवला तर जगातले कितीतरी संघर्ष आपोआप संपून जातील. स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेमावर आधारित नवं सुखी, समृद्ध जग निर्माण होईल. आज जगभर माणसामाणसात द्वेष निर्माण करण्याची स्पर्धा सुरू असताना तुकाराम महाराजांचा हा विचार जगाला नवा दिशा देणारा आहे. 'वसुंधैव कुटुंबकम' ची भावना जोपासणारी आहे. *प्रचलित सर्व धर्म माणसाला माणूस बनवण्यात असमर्थ ठरले आहेत. अशा परिस्थितीत तुकाराम महाराजांचा हा विचारच जगाला तारू शकेल.* - उल्हास पाटील गाथा परिवार ९९७५६४१६७७
गाथा परिवार
सत्य असत्याशी मन केले! ग्वाही मानियेले नाही बहुमता !!
